म.वि.प्र.आश्रमशाळा मोहपाडा (सुरगाणा)

Friday, March 13, 2020

एक प्रवास.........
शाळेची स्थापना : प्राथमिक विभाग – दिनांक ६ सप्टेंबर १९९४
                माध्यमिक विभाग – दिनांक १० जून २००३   
   नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून ७५ कि.मी. अंतरावर , वणी-सुरगाणा मार्गावरच वणी गावापासून २८ कि.मी. अंतरावर सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटाजवळ , सह्याद्रीच्या कुशीत , माता गिराजादेवीच्या छत्रछायेत , गिरणा नदीच्या खोऱ्यात वसलेले टुमदार गाव- मोहपाडा. नावाप्रमाणेच मोहात पाडणारे गाव. गावाला लागुनच वणी-सुरगाणा रस्त्याच्या दुतर्फा वसलेली ही इमारत आहे-- १०० वर्षांची परंपरा असलेली व नावाजलेल्या संस्थेची अर्थात मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेची  - अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा.
         इ.स.१९९४ मध्ये दिनांक ६ सप्टेंबर रोजी गावातील लोकांच्या पुढाकाराने व सहकार्याने भाडोत्री खोल्यांत ही ज्ञानशाखा सुरु केली. “बहुजन हिताय,बहुजन सुखाय” या ब्रीदाशी प्रामाणिक राहून म.वि.प्र.समाज संस्थेने आदिवासी भागातील या गावात ज्ञानयज्ञाचा प्रारंभ केला.
    गावातील जेष्ठ नागरिक श्री.सखाराम रायाजी गायकवाड , अमृता काळू पवार, वामन सोनू दळवी, काशिनाथ झिप्रू जाधव अन गावकरी व तरुण वर्गाने शाळेला आधार देत शिक्षकांच्या मदतीने व अपार मेहनतीने शाळेत ही आदिवासी गोंडस मुले आकार घेऊ लागली. अन बघता-बघता १० जून २००३ ला इयत्ता ८ वी चा वर्ग सुरु झाला. अन अवघ्या तीन वर्षात नैसर्गिक वाढीने आमची आश्रमशाळा १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण देणारे ज्ञानमंदिरच झाले. शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. सुभाष दळवी व विद्यमान प्राथमिक मुख्याध्यापक श्री. संतोष गौळी यांच्या साथीने व मार्गदर्शनाने शाळा बाळसे धरू लागली. शाळा पुस्तकी शिक्षणाबरोबर संस्कारांची शिदोरी देणारी आधारवडच ठरू लागली.
     १२ ऑक्टोबर २०१० साली संस्थेचे माजी सरचिटणीस व कार्यकुशल आमदार डा वसंतराव पवार यांच्या दूरदृष्टीने  व पुढाकाराने गावाजवळच कै. धवळू दळवी यांचेकडून ५ एकर जागा शाळेसाठी संपादित केली. इमारतीचे भूमिपूजन मा.खा. हरिश्चंद्र चव्हाण , कै.आमदार ए.टी.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मोहपाडा गावाला अन परिसराला शोभेल व अभिमान वाटेल अशी प्रशस्त , सर्व सोयी-सुविधा असणारी शाळा व वसतिगृह इमारतीचे बांधकाम सन २०१३ अखेर पूर्ण झाले.
      शाळेची पटसंख्या गुणवत्तेच्या जोरावर भरभर वाढू लागली. येथील शिक्षक वर्गाच्या अपार मेहनतीने व मुख्याध्यापकांच्या खंबीर साथीने आणि मार्गदर्शनाने कृतीशील शिक्षणाबरोबरच विविध सहशालेय उपक्रम , क्रीडा , सांस्कृतिक , वैज्ञानिक व समाजोपयोगी उपक्रम राबविणारी शाखा म्हणून नावलौकिक मिळविणारी आमची आश्रमशाळा मोहपाडा. या सर्वच क्षेत्रातील बातम्या वृत्तपत्रांमध्ये झळकल्या. बघता-बघता शाळा, परिसरातील पालकांची व विद्यार्थ्यांची पहिली पसंद ठरू लागली. अन दरवर्षी नवीन प्रवेशासाठी पालकांची रीघ लागू लागली. पालकांप्रमाणेच जिल्हा परिषद , प्रकल्प कार्यालय कळवण येथील अधिकाऱ्यांच्याही नजरेत भरणारी आश्रमशाळा ठरली. शाळेत राबविले जाणारे ऋतुरंग सांस्कृतिक महोत्सव , शैक्षणिक सहल , वनभोजन , क्रीडा क्षेत्रातील यश इत्यादी बाबी उल्लेखनीय ठरल्या.
    सन २०१४-१५ , २०१५-१६, २०१६-१७ या सलग तीन वर्षात शाळेचा एस.एस.सी. निकाल १००%, दरवर्षी आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धामध्ये व्हालीबॉल क्रीडाप्रकारात राज्य, विभाग पातळीपर्यंत सहभाग आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये राज्य स्तरावर उपविजेते पदाचे पारितोषिक मिळाले.  म.वि.प्र.सांस्कृतिक महोत्सवात तालुका व जिल्हास्तरावर प्रथम पारितोषिक, शिष्यवृत्ती , एकलव्य व म.वि.प्र.स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी निवड अशा अनेक यशस्वी उपक्रमांसह शाखेची वाटचाल सुरु आहे.
           २१ व्या शतकात जगाच्या स्पर्धेत आश्रमशाळेचे आदिवासी विद्यार्थी देखील आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आमच्या शाळेने चालू शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये माध्यमिक मुख्याध्यापक श्री.दीपक कणसेपाटील व प्राथमिक मुख्याध्यापक श्री. संतोष गौळी यांच्या मार्गदर्शनातून एक अभिनव उपक्रम राबविला. तो म्हणजे  “लोक सहभागातून  डिजिटल शाळा” विशेष म्हणजे याची सुरुवात शिक्षकांनी स्वतःपासून केली. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी एक दिवसाचे वेतन शाळेला दिले. आमच्या या अभिनव उपक्रमाला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ज्ञानरचनावाद रुजविण्यासाठी आकर्षक व ज्ञानवर्धक भित्तीचित्रे रंगकाम केले. आणि शाळेचा कायापालट झाला. या उपक्रमातील पालकांचा मोलाचा वाटा तो शब्दापलीकडचा आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आजची स्वच्छ , सुंदर, आकर्षक , ज्ञानवर्धक शाळा – अर्थात आश्रमशाळा मोहपाडा !
            शाळेने हे सर्व कार्य सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवारकळवण – सुरगाणा तालुका संचालक श्री. अशोकदादा पवार  यांच्या प्रोत्साहनाने व मार्गदर्शनाने तडीस नेले.

             सन १९९४ ते २०१९ या २५ वर्षाच्या काळात शाळेसाठी मुख्याध्यापक , शिक्षक , अधीक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , माजी विद्यार्थी , गावातील जेष्ठ नागरिक , तरुण यांनी मोलाची साथ दिली. ज्ञात- अज्ञात लोकांनी शाळेच्या प्रगतीत हातभार लावला. शाळा त्यांच्या कायमच ऋणात राहील. यापुढेही आपल्यासारख्या होतकरू पालक वर्गाची व विद्यार्थ्यांची साथ आवश्यक आहे व आर्थिक मदतीचा हात सुद्धा !


Warli Painting
YOU TUBE CHANNEL